?
Ask Question
दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव झाला आणि पूर्व युरोपचा नकाशा निश्चित करण्यासाठी ४ ते ११ फेब्रुवारी १९४५ दरम्यान चर्चिल, रुझवेल्ट, व स्टालिन ह्यांच्यात ‘याल्टा परिषदेत’ चर्चा झाली. जर्मनीचे विभाजन, युनाइटेड नेशन्सची स्थापना ह्यासारखे अनेक महत्वाचे निर्णय इथे घेण्यात आले. चर्चीलचा डॉक्टर असलेल्या लॉर्ड मोरान ह्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट बाबत मात्र इथं एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं
 
”looking straight ahead with his mouth open as if he were not taking things in. To a doctor's eye, the President appears very ill. I'd give him no more than a few months to live”
 
या बैठकीच्या अनेक महिने आधीपासून रुझवेल्ट ह्यांची तब्येत बरी नव्हती. थकवा, सतत डोळ्यावर झापड आणि दम्याने त्रस्त होते. याल्टा परिषदेच्या आठ वर्ष आधी, १९३७ मध्ये, वयाच्या ५४ व्या वर्षी रूझवेल्टना उच्च रक्तदाबाचं निदान झालं तेव्हा त्यांचा रक्तदाब होता १६२/९८ . त्याकाळी इतक्या वाढलेल्या रक्तदाबास डॉक्टर्स फारस महत्व देत नसतं. वय वाढेल तसा रक्तदाब थोडासा वाढणार आणि त्यामुळे शरीराला काही गंभीर धोका नाही, असा समज प्रचलित होता. उच्च रक्तदाबाला essential hypertension असं संबोधल जाई.
 
रुझवेल्ट ह्यांचे वैयक्तिक डॉक्टर म्हणून काम पाहत होते एक कान- नाक-घशाचे तज्ञ डॅा मॅकिंटायर. पुढील तीनचार वर्षात मात्र राष्ट्राध्यक्षांनी प्रकृती खालावू लागली. तोवर रक्तदाब वाढून १९४१ मध्ये १८८/ १०५ इतका नोंदवला गेला होता. मसाज, बेडरेस्ट, झोपेच्या गोळ्या असे उपचार सुरू झाले. हळूहळू त्यांची प्रकृती इतकी खालावली कि दैनंदिन कार्यालयीन काम करायला ते सक्षम आहेत कि नाही अशी शंका त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनात येऊ लागली. रुझवेल्ट ह्यांच्या डॅाकटरांनी त्यांना दमा, ब्रॅाकाईटीस वै साठी उपचार करणं सुरू ठेवलं.
 
शेवटी १९४४ मध्ये रुझवेल्ट ह्यांच्या मुलीने नेव्हीमध्ये मेडिकल ऑफिसर व हृदयरोग तज्ञ असलेल्या डॉ हॉवर्ड ह्यांना वडलांना तपासण्याची विनंती केली. सखोल तपासण्यानंतर हॉवर्ड ह्यांच्या लक्षात आलं कि उच्चरक्तदाबाने रुझवेल्ट ह्यांच्या शरीराला पोखरून टाकलं होत. त्यांना हार्ट फेलयुअर, किडनी विकार, तसेच ब्रेन स्ट्रोकही झालेला होता. रुझवेल्ट याल्टा परिषदेत गेले तेव्हा त्यांचा रक्तदाब होता २६०/१५०! ह्या परिषदेमध्ये ते त्यांच्या पूर्ण शारीरिक क्षमतेसह सहभागी नसल्याने अनेक वाटाघाटीत स्टालिनचं पारडं जड ठरल्याचं तज्ज्ञांचं (वादग्रस्त) म्हणणं आहे. याल्टा परिषदेनंतर दोनच महिन्यांनी १२ एप्रिल १९४५ च्या सकाळी रुझवेल्ट त्यांना आलेली पत्रं चाळत होते, तेंव्हा त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला तीव्र वेदना सुरु झाल्या आणि ते खाली कोसळले. त्यावेळी त्यांच्या रक्तदाब ३००/१९० इतका वाढलेला होता. अनियंत्रित रक्तदाबाने मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊन त्यांची प्राणज्योत मालवली होती. एका बलाढ्य आणि विजयी देशाच्या अध्यक्षांना उच्चरक्तदाबाने हरवलं होतं.
 
१९४० च्या दशकात आहार व जोवनशैलीतील बदल ह्याशिवाय फारसे प्रभावी औषधोपचार उपलब्ध नव्हते. ८० वर्षांपूर्वी झालेल्या ह्या घटनेनंतर आज रक्तदाबाच्या निदान व उपचारात क्रांतिकारक म्हणाव्या इतक्या सुधारणा झालेल्या आहेत. निदान आणि उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. असं असतानाही उच्चरक्तदाब हा हृदयविकार, किडनी विकार तसेच ब्रेन स्ट्रोकचं आजघडीचं महत्त्वाचं कारण आहे. ह्याच मुख्य कारण म्हणजे ह्या आजाराबाबत जनमानसातील अज्ञान. पुरेस गांभीर्य नसणं, तपासणी न केल्यानं त्याच वेळेत निदान न होणं, निदान झालं तरी त्याचे उपचार न होणं आणि उपचार घेत असूनही रक्तदाब नियंत्रणात नसणं. उच्चरक्तदाबाबद्दल “रुल ऑफ हाफ” प्रसिद्ध आहे. अर्ध्याहून अधिक लोकांना आपल्याला उच्च रक्तदाब आहे हे माहीत नसतं, ज्यांना माहीत असतं त्यातील अर्धेच लोक योग्य उपचार घेतात, आणि उपचार घेणाऱ्या अर्ध्याहून अधिक लोकांचा रक्तदाब नियंत्रणात नसतो.
 
गंभीर पातळीवर वाढल्यावरही सामान्यपणे उच्चरक्तदाबाची कोणतीच शारीरिक लक्षण दिसत नाहीत. अनेकांचा प्रश्न असतो की चक्कर येण, धाप लागण, डोकं दुखणं अशी कोणतीच तक्रार नसतानाही डॉक्टर सांगतायत उच्चरक्तदाब आहे किंवा तो नियंत्रणात नाही, असं कस? आपला रक्तदाब वाढलेला आहे कि नाही हे समजण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो मोजणं. लक्षणांची वाट बघितल्यावर काय होत हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या उदाहरणावरून लक्षात यावं. ‘वर्ल्ड हायपरटेंशन लीग’ हि संघटना उच्चरक्तदाबाबाबत जागृतीसाठी दरवर्षी ‘जागतिक उच्चरक्तदाब दिवस’ साजरा करते. गेली अनेक वर्षे 'know your number’ असं तीच घोषवाक्य होत. अठरा वर्षावरील प्रत्येक व्यक्तीने आपला रक्तदाब तपासायलाच हवा व तो नॉर्मल आहे ह्याची खात्री करून घ्यावी. ज्यांना उच्चरक्तदाब आहे त्यांनी तो ठरावीक काळाने नियमितपणे तपासायला हवा. गम्मत म्हणून मी माझ्या दहा डॉक्टर मित्रांना विचारल, तुझा रक्तदाब किती आहे? तू तो शेवटचा कधी तपासाला होता? दहातील फक्त तिघांनी तो तपासला होता. आता सामान्य जनतेमध्ये तर ह्या आजाराबद्दलच अज्ञान किती असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. एकवेळ अज्ञान परवडलं, ते माहितीने दूर करता येईल, पण आजकाल व्हाट्सअप विद्यापपीठातून मिळणाऱ्या चुकीच्या माहितीच निवारण करणं हे दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये कर्मकठीण काम आहे. ‘बीपीच्या गोळ्यांचे भयंकर साईड इफेक्ट्स आहेत, शक्यतो न घेतलेल्या बऱ्या', ‘वर्षानुवर्षे गोळ्या घेऊन किडनी निकामी होईल’, ‘एकदा गोळ्या घेतल्या कि त्यांची सवय लागेल’ हे आणि ह्यासारखे अनेक गैरसमज आजार आणि उपचारांबाबत आढळतात.
 
ह्यावर्षीच्या जागतिक उच्चरक्तदाब दिनाचा संदेश आहे 'आपला रक्तदाब अचूकपणे मोजा, तो नियंत्रणात ठेवा आणि दीर्घायुषी व्हा'. ह्यामध्ये ‘रक्तदाबाचे अचूक मोजमाप’ हा महत्वाचा संदेश आहे. गेल्या अनेक वर्षात रक्तदाबाच्या उपचारांबाबत झालेल्या संशोधनात अचूक मोजमापाचे महत्व अधोरेखित झालेलं आहे. सहज क्लिनिकमध्ये पाहिलेला रक्तदाब तुमच्या इतर बहुतेकवेळा असलेल्या रक्तदाबाचा अचूक निदर्शक असेलच असं नाही किंबहुना बऱ्याचदा तो नसतोच. त्यामुळं तो standardised method वापरून क्लिनिक मध्ये किंवा घरी मोजणं किंवा २४ तासाच्या बीपीच मोजमाप करणाऱ्या विशेष मशीन द्वारे मोजणं आवश्यक ठरत. ह्या रिडींग बऱ्याचदा क्लिनिकमध्ये सहज म्हणून मोजल्या गेलेल्या रक्तदाबाहून कमी असतात. उच्चरक्तदाबाच्या सुरुवातीला निदानासाठी तर तो अशा प्रकारे मोजणं अत्यंत महत्वाच ठरत. कारण बहुतेक रुग्णांना उपचार आयुष्यभर सुरु ठेवावे लागतात. रक्तदाबाच्या अशा प्रकारे केलेल्या मोजमापामुळे अनावश्यक उपचार टळतात, आणि ज्यांना उपचार सुरु आहेत अशा रुग्णांमध्ये औषधांची गरज व परिणाम अचूकपणे लक्षात येतात.
 
वय वाढेल तसा आपला रक्तदाब वाढतो, काहींचा तो ठराविक मर्यादेच्या पलीकडे वाढून औषंधाची गरज भासते. गेली कित्येक वर्षे ‘वाढणार वय’ हा उच्चरक्तदाबासाठीचा 'non modifiable' रिस्क फॅक्टर मानला जायचा. पण ह्या गृहीतकाला ‘निल मुलर’ ह्या शास्त्रज्ञाने केलेल्या संशोधनाने आव्हान दिलं. दक्षिण अमेरिकेतील जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासींमध्ये वय वाढेल तसा रक्तदाब वाढताना दिसत नाही. ‘यानोमामी’ ह्या गावात त्यानं जन्मापासून चाळीशी पन्नाशीपर्यंत रक्तदाबाचा अभ्यास केला असता असं आढळलं की इतर सर्वत्र दिसणारा वयाचा बीपीवरील परिणाम इथे दिसत नाही. वय वाढूनही रक्तदाबाब मात्र वाढत नाही. ह्याउलट अशाच एक दुसर्या -ऐकवाना-ह्या गावात मात्र वयाबरोबर रक्तदाब वाढलेला आढळला. काय फरक होता ह्या दोन गावांत? यानोमामी मधील लोकांच्या आहारात मिठाचं प्रमाण नगण्य आहे तर -एकवाना मध्ये मात्र ते गेल्या काही दशकात वाढल होतं. मुळात त्यांच्या हि आहारात मीठ नव्हतच, पण तिथे आरोग्य, शिक्षण ह्या सुविधा देण्याच्या उद्देशाने एक एअर स्ट्रीप निर्माण झाली आणि हळूहळू शहरी आहाराच्या मीठ खाण्याच्या सवयी ह्या गावातील लोकांनी अंगिकारल्या. आहारातील मीठ आणि उच्चरक्तदाबाचा घनिष्ठ संबंध ह्या संशोधनाने अधोरेखित झाला.
 
मीठाबरोबरच वजनाचाही रक्तदाबाशी जवळचा संबंध आहे. लठट असलेल्यांना उच्च रक्तदाबाचा धोका आधिक. साधारणपणे १० किलो वजन कमी केल्याने वरचा रक्तदाब १० मिमी ने कमी होतो. अशा प्रकारे आहार व जीवनशैलीतील बदलांमुळे काही रुग्णांचा रक्तदाब गोळ्या न घेतानाही सामान्य झाल्याची उदाहरण आहेत. गोळ्या बंद झाल्या नाहीत तरी रक्तदाब नियंत्रणात यायची, औषधांची संख्या किंवा डोस कमी व्हायची शक्यता तरी असतेच. घरी रक्तदाब पाहणं श्रेयस्कर असलं तरी औषधातील बदल मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच केले पाहिजेत.
 
आजवर तपासला नसेल तर रक्तदाब जरूर तपासा. वाढलेला नसेल तरीही आहार व जीवनशैलीत सुधारणा करून वयानुसार तो वाढण्याचा धोका टाळा. वाढलेला असेल तर न घाबरतां डॅाकटरांचा सल्ला घ्या. तो नियंत्रित ठेवला तर अनेक गंभीर आजारांचा सहज प्रतिबंध होईल.


Read More:
Effective Asthma Treatment with Dr. Tejal Dravid, Consultant Physician in Pashan, Pune


Book  Appointment
 
AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com
Site-Help | Disclaimer